बदलापूर घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात शाळा-शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची लगबग सुरू झाली आहे.सोलापूर जिल्ह्यात ३२५ खासगी प्राथमिक तर ६५३ खासगी माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. तर जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या २८०० वर आहे. तसेच ३५० शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. सोलापूर शहरातही खासगी आणि महापालिकेच्या शाळा आहेत. याशिवाय ११५ उच्च माध्यमिक शाळा आहेत.
सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे युद्धपातळीवर बसविले जात आहेत. ज्या शाळांमध्ये यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते आणि ते सध्या नादुरुस्त किंवा बंद आहेत, ते तत्काळ सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक आहे. परंतु या नियमाची अंमलबजावणी होत नव्हती. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षक संघटनांनीच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे