संधी असताना राजकारणापासून दूर राहण्याचे काळुंगेचे संकेत..

मंगळवेढा : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना मानणाऱ्या मंगळवेढ्यातील शिवाजीराव काळुंगे आपल्या आयुष्यात केलेले शैक्षणिक आर्थिक व सामाजिक कार्य दाखवण्यात यशस्वी ठरले असले तरी भविष्यात मात्र राजकारणापासून दूर राहण्याचे संकेत दिले.

राजकारणाबरोबर मंगळवेढ्यातील वेगवेगळ्या सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक,दुष्काळ प्रश्नात सहभाग नोंदवत शिवाजीराव काळुंगे व शोभा काळुंगे यांनी धनश्री पतसंस्थेची स्थापना केली. या पतसंस्थेच्या माध्यमातून तालुक्याची आर्थिक घडी बसवत कार्यक्षेत्रातील अनेक बेरोजगारांना, व्यवसायासाठी, शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देऊन बँकेची वाटचाल सुरू ठेवली. या दोघा पती-पत्नींनी कर्जदार, ठेवीदाराचा मोठा विश्वास संपादन केल्यामुळे दीड हजार कोटींच्या ठेवी या संस्थेने पार केल्या.

धनश्रीच्या माध्यमातून जिल्ह्यातील साखर कारखानदारी जिवंत ठेवण्यासाठी सर्वच कारखानदारांनाही अर्थसहाय्य केल्यामुळे मा.आमदार प्रशांत परिचारक यांनी एका कार्यक्रमात शिवाजीराव काळुंगे यांनी कारखानदाराला मदत केली नसती तर शेतकऱ्या प्रमाणे कारखानदारांनाही आत्महत्या कराव्या लागल्या असता असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एवढे प्रभावी काम करणाऱ्या शिवाजीराव काळुंगेना राजकीय संघर्ष करावा लागला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल पक्षाने त्यांना बी फार्म दिल्यामुळे त्यांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांची साथ सोडल्यामुळे त्यांना एकाची लढत द्यावी लागली.

त्यामुळे त्यांनी गेल्या चार वर्षे राजकीय वातावरणापासून थोडे लांब राहण्याचा निर्णय घेतला परंतु जिल्ह्यातील साखर कारखानदारी जतन करण्यात ज्याप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व स्व. सुधाकर परिचारक यांनी योगदान दिले त्याप्रमाणे सध्या कारखानदारी टिकवून ठेवण्यात शिवाजीराव काळुंगे यांनी योगदान दिले.

जिल्ह्यातील कारखानदाराला केलेल्या आर्थिक मदत व त्यांचा व्याप पाहता त्यांची राजकीय बस्तान देखील अलीकडच्या काळात मजबूत झाले आहे अशा परिस्थितीत धनश्री पतसंस्थेचा रौप्य महोत्सव, धनश्री मल्टीस्टेटची तपपृती व शिवाजी काळुंगे यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे एकाच व्यासपीठ आहेत.

जिल्ह्यातील साखर उद्योगाचे पुनर्वसन करणारे शिवाजीराव काळुंगे यांचे राजकीय पुनर्वसन विधानपरिषदेत हे दोन्ही नेते करणार का ? त्याचे सर्वच क्षेत्रातील काम पाहता सर्वच राजकीय पक्षाशी त्यांचे असलेले संबंधही चांगले आहेत त्यामुळे त्यांना महायुतीकडून सुद्धा ऑफर येण्याची शक्यतेची चर्चा देखील या निमित्ताने मंगळवेढ्यातील राजकीय वर्तुळात झाली.

धनश्री परिवारातील सदस्यांना शिवाजीराव काळुंगे यांना विधानसभा किंवा विधानपरिषद मध्ये जाण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा असतानाच दस्तुरखुद्द शिवाजीराव काळुंगे यांनीच आपण राजकीय वर्तुळातून दूर असल्याचे सांगून या चर्चेला पूर्णविराम दिला असला तरी भविष्यात जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मात्र स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यात ते यशस्वी ठरले असते.