पाकणी रेल्वे स्टेशनवर नोकरीला गेल्यानंतर घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्याने वसंत विहार, गायत्रीनगर भाग-दोन मधील सतीश दिगंबर गव्हाणे यांच्या घरात चोरी केली आहे. याशिवाय नीलेश चंद्रकांत कांबळे व राहुल रमेश मोरे यांच्या घरासमोरील दोन दुचाकी देखील चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.एकूण दोन लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. नोकरीवर जाताना गव्हाणे यांनी घराच्या लोखंडी सेफ्टी दरवाजाला बाहेरून कुलूप लावले, तत्पूर्वी आतील दरवाजा देखील बंद केला होता. तरीदेखील चोरट्याने लोखंडी सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून, आतील कुलूप उघडून घरात प्रवेश केला.
त्यानंतर घरातील साडेतीन तोळ्याचे गंठण, एक तोळ्याची सोन्याची चेन, पाच ग्रॅमची पिळ्याची अंगठी, दहा भार वजनाचे चांदीचे पैंजण, पाच ग्रॅमचे मंगळसूत्र, असा एकूण दोन लाख पाच हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचेही पोलिसांना सांगितले.दुसरीकडे याच भागातील नीलेश कांबळे यांच्या घरासमोरील दुचाकी (एमएच १३, सीए ५००१) व राहुल कोरे यांची दुचाकी (एमएच १३, एटी ९४५१) चोरून नेली आहे. २९ मे रोजी रात्री सात ते ३० मेच्या सकाळी आठपूर्वी ही चोरी झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे तपास करीत आहेत.