प्रजासत्ताक दिन गणवेशाविनाच! दोन दिवसांत गणवेश पोचविण्याचा शिक्षण विभागाचा दावा….

चालु शैक्षणिक वर्षात कोट्यवधी रुपये खर्चून एकाच कंपनीकडून कापड खरेदी व महिला आर्थिक महामंडळामार्फत महिला बचत गटांकडून शिवून दोन गणवेश देण्याचा निर्णय तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने घेतला होता. मात्र, वेळेत कापड न मिळाल्याने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनीही पहिले गणवेश मिळू शकले नव्हते. ते निम्मे शैक्षणिक सत्र संपायला आल्यावर मिळाले.

त्यानंतर विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडच्या दुसऱ्या गणवेशाची प्रतीक्षा होती. आता प्रजासत्ताक दिन दोन दिवसांवर आले असून शैक्षणिक वर्ष संपायला तीन महिने उरले आहेत. मात्र, अद्याप ७४ हजार ४५० विद्यार्थ्यांसाठीचे गणवेश शाळांपर्यंत पोहोचले नाहीत. तयार गणवेशाची स्थिती पाहता आणखी १६ हजार ३६६ गणवेश लागणार आहेत.

मात्र, प्रजासत्ताक दिनापूर्वी उर्वरित विद्यार्थ्यांनाही गणवेश मिळतील, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.जिल्ह्यातील सव्वालाख विद्यार्थ्यांना दुसरे स्काऊट गाईडचे गणवेश दिले आहे. रोज शाळांना गणवेशाचे वाटप केले जात आहे. त्यासाठी गणवेश शिवून तयार आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांसाठीचे गणवेश वाटप होईल. प्रजासत्ताक दिनापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील, या दृष्टीने नियोजन केले आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनीही पहिले गणवेश मिळाले नव्हते. आता प्रजासत्ताक दिन दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही सर्व शाळांपर्यंत दुसरे गणवेश पोचू शकले नाही.मात्र, गणवेश तयार असून सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.