के. पी. पाटलांची महायुतीच्या कार्यक्रमाला दांडी; समरजित घाटगेंची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी…..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या ए.वाय. पाटील यांच्या पाठोपाठ त्यांचे मेहुणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार के. पी. पाटील (K. P. Patil) यांचीही पावले महाविकास आघाडीच्या दिशेने पडत आहेत. काल महायुतीच्या वतीने आयोजित लाडकी बहीण सन्मान योजनेच्या कार्यक्रमाला पाठ फिरवून त्यांनी हे संकेत दिले आहेत.

दरम्यान, भाजपला ‘जय श्रीराम’ म्हणत राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनीही आजच्या कार्यक्रमाला दांडी मारून आपला निर्णय झाल्याचे जवळपास सिद्धच केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर के. पी.- ए. वाय. या मेहुण्या-पाहुण्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण, विधानसभेला ज्याचा आमदार त्याला मतदारसंघ हे सूत्र महायुतीत निश्‍चित झाल्यानंतर ए. वाय. यांच्याबरोबरच के. पी. यांनीही राष्ट्रवादी अजित पवार गटापासून दोन हात लांब राहणेच पसंत केले होते.

त्यानंतर झालेल्या पक्षाच्या जिल्हा मेळाव्यालाही ते अनुपस्थित होते. याउलट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या दौऱ्यात त्यांचा वावर दिसत होता.