कोल्हापुरात भाजपला धक्का! अखेर समरजित घाटगे तुतारी हाती घेणार

शाहू समुहाचे नेते समरजीत घाटगे अखेर भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. कागलमध्ये आज, शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी चार वाजता कागलमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. यासाठी जयंत पाटील मुंबईहून खास विमानाने कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री घाटगे यांची त्यांच्या नागाळा पाकमधील निवासस्थानी भेट घेत आणि त्यांच्याशी चर्चा करत मनधरणी केली होती.

मात्र यावेळी मी फार पुढे गेलो आहे आता मागे फिरणे अशक्य आहे अशा स्पष्ट शब्दात समरजित घाटगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.