गणपतीला जसा मोदकांचा नैवेद्य प्रिय असतो, तसेच श्रीकृष्णाला पंजिरी आवडते, असं आपल्याकडे मानलं जातं. त्यामुळे बहुतांश भागांमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णासाठी आवर्जून पंजिरी केली जाते आणि तिचाच या दिवशी खरा मान असतो.
पंजिरी घरच्याघरी करणं अतिशय सोपं आहे. शिवाय ती करण्यासाठी खूप वेळदेखील लागत नाही. त्यामुळे ही एक अतिशय सोपी रेसिपी पाहा आणि पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्णाला पंजिरीचा नैवेद्य दाखवा.
पंजिरी करण्याची रेसिपी
साहित्य
अर्धा कप मखाना,पाव कप धणे पावडर,अर्धा कप पिठीसाखर,पाव कप खोबऱ्याचा किस,पाव कप तूप,अर्धा कप सुकामेव्याचे तुकडे२ टी स्पून वेलची पूड
रेसिपी-
कढई गॅसवर गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकून भाजून घ्या- यानंतर कढईत तूप टाका आणि मंद गॅसवर मखाने परतून घ्या. त्यानंतर सुकामेव्याचे तुकडेही परतून घ्या.
नंतर धणे पावडर कढईमध्ये टाकून ती थोडी गरम करून घ्या आणि मग खोबऱ्याचा किस, सुकामेवा, मखाना, वेलची पूड असं सगळंच कढईत टाकून सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या. साधारण एखाद्या मिनिटाने गॅस बंद करा आणि हे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतरच त्यात साखर टाका. पुन्हा एकदा सगळे पदार्थ हलवून झाले की श्रीकृष्णाच्या आवडीची पंजिरी झाली तयार.