मोठी बातमी! राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पहिला उमेदवार ठरला

लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच भाजपनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

ज्यामध्ये 195 उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या सहा आणि सात तारखेला महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे.

मात्र या बैठकीपूर्वीच मोठी बातमी समोर आली आहे.जागा वाटप होण्यापूर्वीच महाविकास आघाडीचा पहिला उमेदवार ठरला आहे. सुप्रिया सुळे यांनी आपण बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत याबाबत घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर बारामती लोकसभेचं रणशिंग फुंकलं आहे.

आपण बारामती लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबरोबरच गेल्या पाच वर्षांमध्ये बारामतीत काय काय विकास कामं झाली? याचा लेखाजोखा मांडतानाच त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन देखील केलं आहे.