विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते ५ सप्टेंबर रोजी कडेगाव येथे स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी येत आहेत.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आ. डॉ. विश्वजित कदम यांनी सोमवारी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.डॉ. कदम यांनी सांगितले, स्व. पतंगराव कदम यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळेच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी शिक्षक दिनाचा मुहूर्त साधण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष खा. शरद पवार, उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आदी मान्यवरांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी स्व. पतंगराव कदम यांचे मूळ गाव असलेल्या सोनसळ येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून यानंतर कडेगावमधील बयाबाई कदम महाविद्यालयाच्या पटांगणात मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास सुमारे दोन ते अडीच लाख लोक उपस्थित राहतील असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती असल्याने या निमित्ताने निवडणुक प्रचाराचे रणशिंग कडेगावमध्ये फुंकले जात असल्याचे मानले जात आहे.