Rajarambapu Sugar Factory : राजारामबापूंची संकल्पना अन् जयंत पाटलांनी कारखाना परिसरात उभारलं देखणं राम मंदिर

सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील (Rajarambapu Patil) यांनी ४२ वर्षांपूर्वी श्रीराम मंदिराची संकल्पना मांडली. तत्कालीन वाळवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्रीराम मंदिराचे भूमिपूजन केले. बापूंच्या निधनानंतर पुत्र तथा आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सहा वर्षांतच मंदिराचे काम पूर्णत्वास नेले. सध्या राजारामनगर (ता. वाळवा) येथील कारखाना कार्यस्थळावर भव्य, देखणे श्रीराम मंदिर उभे आहे.

आकर्षक कळस, गाभारा व मार्बलमध्ये बांधलेला मंडप, दगडी कमान, हिरवागार बगीचा आहे. हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. कारखाना स्थापनेनंतर १३ वर्षांनी कार्यस्थळावर श्रीराम मंदिर बांधण्याचा निर्णय झाला. कारखान्याच्या पश्चिम बाजूची २० गुंठे जागा निश्चित केली.

जगार हमी योजनेचे प्रणेते वि. स. पागे यांच्या हस्ते १५ जुलै १९८२ रोजी भूमिपूजन झाले. मात्र बापूंचे निधन १७ जानेवारी १९८४ रोजी झाले. त्यांचे पुत्र जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अध्यक्षपदाची धुरा घेतल्यानंतर मंदिराच्या कामाला गती दिली. स्वतः अभियंते असल्याने आराखडा अद्ययावत करत मंदिराचे लोकार्पणही केले.

श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची मूर्ती राजस्थानातील जयपूरहून आणल्या आहेत. प्रसिद्ध मूर्तिकार बन्सीलाल शर्मा यांनी तयार केल्या आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून या श्रीराम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी केली जात आहे. दरवर्षी संक्रातीला १० ते १२ हजार महिला भक्तिभावाने सीतामाईला वाण देण्यासाठी मंदिरात येतात.