उद्या राहुल आवाडे युवाशक्तीच्यावतीने सर्वात मोठी दहीहंडी

थरांची स्पर्धा…. गोपाळांचा जल्लोष… बक्षिसांची लयलूट असा माहोल दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने इचलकरंजीत पाहायला मिळणार आहे. प्रत्येक वर्षी आकर्षण आणि उत्सुकतेचा केंद्रबिंदु ठरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीचा थरार इचलकरंजीकरांना यंदा पाहता आणि अनुभवता येणार आहे. राहुल आवाडे युवा शक्तीच्या बतीने बुधवार २८ ऑगस्ट रोजी यशोलक्ष्मी सांस्कृतिक भवन लगतच्या मोकळ्या मैदानात होत आहे. विजेत्या गोविंदा पथकास तब्बल ३.११ लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, स्पर्धेत मोठ्या संख्येने पथके सहभागी होण्यास इच्छुक असली तरी स्थानिकांना प्राधान्य या हेतुने कोल्हापूर जिल्ह्यातील पथकांना प्राधान्य देण्यात आले आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य दिव्य स्पर्धा रंगणार आहे. नयनरम्य विद्युत रोषणाई, चित्ताकर्षक आतषबाजी हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य असणार आहे. स्पर्धेत सहभागी गोविंदांना कोणत्याही प्रकारची इजा अगर गैरसोय होऊ दिली जाणार नाही.

स्पर्धास्थळी आवश्यक त्या सर्व उपाययोजन केल्या जाणार आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने रिल्स कॉम्पिटीशनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे जो कोणी सर्वोत्कृष्ठ रिल्स बनवेल अशा विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही दिली जाणार आहेत.