इचलकरंजी शहरवासियांना दिलासा! कृष्णा, पंचगंगेतून पाणी उपसा सुरू, शुक्रवारनंतर एक दिवसआड पाणी देण्याचे नियोजन

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न खूपच चर्चेत आहे. या भागातील नागरिकांची पाण्यासाठी खूपच वणवण होते. सतत लागणारी गळती तसेच अपुरा पाणीपुरवठा यामुळे शहरवासियांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. गेल्या ८-१० दिवसांपूर्वी कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या उच्चदाब विद्युत तारेवर नारळाच्या झाडाची फांदी पडल्याने कुरूंदवाड येथील मराठी शाळेजवळ विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे कृष्णेतून पाणी उपसा बंद केला होता. तब्बल १४ तासांच्या प्रयत्नांतून वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले होते. त्यानंतर कृष्णेतून पाणी उपसा सुरळीत करणेत आला होता.

याच दरम्यान, पंचगंगा नदीची पातळी घटल्याने पाणी उपसा बंद केला होता. याचा विपरीत परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर झाला होता. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच शहरवासियांना सहा-सात दिवसांतून एकदाच पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला पाण्यासाठी इतरत्र आधार घ्यावा लागला. तसेच पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी कमालीची घटल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकावर झाला होता. 

मात्र, धरणातून पाणी सोडल्यामुळे पंचगंगा नदी प्रवाहीत झाली असून बंद असलेला पाणी उपसा सुरळीत झाला आहे. पंचगंगा नदीतून ३०० अश्वशक्ती पंपाद्वारे पाणी उपसा केला जात आहे. तर कृष्णा नदीतून ५४० अश्वशक्तीच्या दोन पंपाद्वारे उपसा केला जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बिघडलेले पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. येत्या मंगळवारपासून शहरातील काही भागात दोन दिवसआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.

तर शुक्रवारनंतर एक दिवस आड पाणी देण्याचे नियोजन आखले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मजरेवाडी येथील कृष्णा नळपाणी पुरवठा योजना व पंचगंगा नदीतून पाणी उपसा पुर्ववत सुरू झाला आहे. त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला असून पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.