धरण क्षेत्रासह कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. परिणामी राधानगरी धरणाचे स्वयंचलित सहा दरवाजे उघडले असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होऊन इचलकरंजी येथील लहान पुलाला पुराचे पाणी घासू लागल्याने यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा पुराचा धोका इचलकरंजीकरांना वाढला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाने राधानगरी धरणातील पाणीसाठा मध्ये वाढ होऊन स्वयंचलित सहा दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. इचलकरंजी येथे पंचगंगा नदीची पाणी पातली ५६ फुटावर आली असल्याने पाणी लहान पुलाला खाली घासू लागले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इचलकरंजी नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.