इचलकरंजी, शहरात आठवड्यापासून एकदा- दोनदा होणाऱ्या पाणी पुरवठ्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर येत्या काही दिवसापासून एक दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केले जात आहे. मात्र, तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास पाणी सोडण्यामध्ये अडचण येण्याची शक्यता आहे.
इचलकरंजी शहरातील पाणी पुरवठयाला कित्येक वर्षापासून ग्रहण लागले आहे. त्यामुळे शहरवासीयांना वेळो-अवेळी आठवड्यातून एकदा अथवा दोनदाच पाणी पुरवठा होतो. शहराला मजरेवाडी येथून नळपाणी पुरवठा योजना व पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेच्या वितरण नलिकेला लागणारी गळती तसेच खंडीत वीज पुरवठयामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडते अनेक भागात दोन-तीन दिवसानी उशिरा पाणी पुरवठा होतो. या प्रकारामुळे नागरिकांना विशेषत: महिलांना पाण्यासाठी इतरत्र आधार घ्यावा लागतो. अनेक वेळा पाणी पुरवठयाच्या कोलमडलेल्या नियोजनामुळे नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येते. अपुऱ्या पाणी पुरवठा विरोधात विविध पक्षाच्यावतीने आंदोलनही पुकारली जातात. मात्र, पाणी पुरवठयाचे ग्रहण सुटत नसल्याचे दिसते.
मात्र, महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून प्रायोगिक तत्वावर शहरातील विविध भागात एक दिवस आड पाणी सोडण्याबाबत नियोजन सुरू आहे. सध्या मजरेवाडीतील कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेतून ३५ ते ३७ एमएलडी पाणी उपसा केले जाते. यातून एकदिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, वितरण नलिकेला गळती अथवा वीज पुरवठा खंडीत झाल्यास पाणी पुरवठ्याच्या नियोजनामध्ये अडचणी होण्याची शक्यता आहे असे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी बाजीराव कांबळे यांनी सांगितले.
सध्या शहरातील विविध भागात चार ते पाच दिवसाने एकदा पाणी येत आहे. त्यामध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्यास त्याचबरोबर वितरण नलिकेला गळती झाल्यास सहा ते सात दिवसातून पाणी येत आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या कामकाजाबद्दल नागरिकांतून विशेषत: महिलावर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
