इचलकरंजी, शहापूर परिसरातील साईनगर करांडे मळा भागातील गादी कारखान्यात शॉर्टसर्कीटने आग लागली. या दुर्घटनेत जवळपास ५ लाखांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या २ बंबांनी पाण्याचा मारा करत अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. या घटनेबाबत पोलीसात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सलीम राजू नदाफ यांचा शहापुर येथील साईनगर करांडे मळा परिसरात गादी कारखाना आहे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे नदाफ यांनी कारखाना बंद केला होता. परंतु मंगळवारी सकाळी धुर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती नदाफ आणि शहापूर पोलीस ठाण्यास दिली. तसेच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. यावेळी नागरीक आणि अग्निशमन दलाच्या २ बंबांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. या घटनेत कापसाचा साठा, ड्रॉव्हरमधील मोबाईल, इलेक्ट्रिक वजनकाटा, मशिन तयार गाद्या, टेबल यासह अन्य साहित्य जळुन खाक झाल्याने सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत नोंद झाली नव्हती.
