कोरोची येथील जिल्हा परिषद शाळेच्या कन्या विद्यामंदिरचे मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांनी केलेल्या गैरवर्तणुकीमुळे नागरिकांनी चांगलाच चोप दिला. दरम्यान जमाव येत असल्याचे पाहून भोकरेंनी शाळेतून पलायन केले. दोन दिवसांपूर्वी मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांचे गैरवर्तनाबाबत शाळेतील मदतनीस यांनी ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख व सौ संगीता शेट्टी यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत सदस्य साहेबलाल शेख यांनी मुख्याध्यापक भोकरे यांना शनिवारी चांगलेच धारेवर धरले होते.
एवढे प्रकरण घडूनही शाळा सुटल्यानंतर भोकरे याने त्या मदतनीस व एका शिक्षिकेशी असभ्य वर्तन केल्याचे समजले. भोकरे विरोधात गटशिक्षण अधिकारी, हातकणंगले यांच्याकडे तक्रार देण्यासाठी सोमवारी सरपंच डॉ. संतोष भोरे सर्व सदस्य कन्या विद्या मंदिर येथे जमा झाले. त्यांनी मुख्याध्यापक भोकरेना केलेल्या गैरवर्तणुकीबद्दल विचारून चांगलेच धारेवर धरले. हा प्रकार घडत असताना जमलेल्या नागरिकांनी मुख्याध्यापक भोकरे यांच्या अंगावर जाऊन त्याला चांगलाच चोप दिला.
दरम्यान, सरपंच डॉ. भोरे यांनी ग्रामपंचायती मध्ये सर्व सदस्यांची बैठक घेऊन मुख्याध्यापक भोकरे यांच्या गैरवर्तणूकीची दखल घेत त्याना तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीचा ठराव केला. याबाबतचे निवेदन व ठराव गटशिक्षण अधिकारी यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.