विविध कारणांमुळे नेहमीच प्रकाशझोतात असणाऱ्या इचलकरंजी महापालिकेतील आयुक्त व प्रशासक ही दोन्ही महत्त्वपूर्ण पदे दोन व्यक्तींकडे असल्यामुळे अर्थसंकल्पाविषयी उत्सुकता लागून राहिली आहे. प्रशासकपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी यांच्याकडे असल्यामुळे आगामी अर्थसंकल्पात कोणती करवाढ होणार की मागील वर्षीप्रमाणे विना करवाढीचा अर्थसंकल्प सादर होणार, हे पाहावे लागणार आहे. मध्यंतरी महापालिकेसंदर्भात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे आयुक्तांकडे असलेले प्रशासकपद हे जिल्हाधिकारी यांच्याकडे गेले आहे.
विविध निर्णय घेताना वारंवार प्रशासकांच्या निर्णयाची आवश्यकता असते. त्यामुळे पुन्हा प्रशासकपद हे आयुक्तांकडे देणार का, याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे. सुळकूड योजना रद्द झाल्यामुळे त्याच्या रकमेचा जमेच्या बाजूत त्याचा समावेश असणार का, हेही पाहावे लागणार आहे. मागील वर्षी २८ फेब्रुवारीला २२ कोटी शिलकीसह ६२५ कोटी रुपयांचा महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यावर्षी अद्याप तो सादर करण्यात आलेला नाही. त्यामध्ये कोणतीही करवाढ केलेली नव्हती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.
यावर्षी निवडणुका नाहीत. तसेच अद्याप जीएसटीचा परतावा महापालिकेला मिळालेला नाही. महापालिकेला देण्यात येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या सहायक अनुदानामध्ये काटछाट केली जात आहे. त्यामुळे नवीन करवाढीचे स्त्रोत शोधण्याची महापालिकेला गरज आहे.
