कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहापैकी पाच जागांवर अटीतटीच्या दुरंगी लढती होतील असे संभाव्य चित्र आजच्या घडीला स्पष्ट होताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा शिंदे सेना पदरात पाडून घेण्याची चिन्हे दिसत आहेत.याउलट राज्यात सर्वाधिक जागा लढवणाऱ्या भाजपच्या वाट्याला मात्र कशीबशी एकच जागा जाईल असे चित्र आहे. त्यांचा तसाही सध्या जिल्ह्यात एकही आमदार नसल्याने ही स्थिती भाजपवर ओढावली आहे.
हातकणंगले काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे, जनसुराज्यशक्ती पक्षाचे अशोकराव माने व माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्यात लढत होईल अशी चिन्हे दिसत आहेत. या जागेसाठी कोरे यांचा दावा आहे. त्यामुळे ते सहजासहजी ही जागा शिंदेसेनेला देण्याची शक्यता नाही. लोकसभेला खासदार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी कोरे यांनी लावलेली ताकद मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. त्यामुळे ते कोरे यांना दुखावून काय करतील असे वाटत नाही.