इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढतीची चिन्हे….

कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहापैकी पाच जागांवर अटीतटीच्या दुरंगी लढती होतील असे संभाव्य चित्र आजच्या घडीला स्पष्ट होताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा शिंदे सेना पदरात पाडून घेण्याची चिन्हे दिसत आहेत.याउलट राज्यात सर्वाधिक जागा लढवणाऱ्या भाजपच्या वाट्याला मात्र कशीबशी एकच जागा जाईल असे चित्र आहे. त्यांचा तसाही सध्या जिल्ह्यात एकही आमदार नसल्याने ही स्थिती भाजपवर ओढावली आहे. दुरंगी लढतीची चिन्हे ज्या मतदार संघात दिसत आहेत, तिथे जर-तरच्या घडामोडीही निर्णायक ठरणाऱ्या आहेत.

कोल्हापूर उत्तर आणि इचलकरंजीवरील हक्क भाजप सहजासहजी सोडणार नाही. या जागा मिळाव्यात म्हणून शेवटपर्यंत भाजप ताकद पणाला लावू शकते. ही जागा शिंदेसेनेकडे गेल्यास भाजपचे सत्यजित कदम आणि इचलकरंजीची जागाही शिंदेसेनेकडे गेल्यास माजी आमदार सुरेश हाळवणकर कोणती भूमिका घेतात याला महत्व असेल. हाळवणकर यांचा पिंड पक्षाचा आदेश पाळण्याचा आहे. त्यामुळे ते जरूर नाराज होतील. परंतु पक्षाच्या उलटे जावून काही करतील असे वाटत नाही. पक्षीय पाठबळ नसताना रिंगणात उतरणे सोपे नाही. त्यामुळे सत्यजित कदम यांच्यासमोरही पेच असेल.

इचलकरंजीत भाजप १९७८ पासून लढत आला आहे. दोनवेळा ही जागा भाजपने जिंकली आहे हे खरे असले तरी आता तिथे आवाडे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा त्यांनाच जाणार हे स्पष्टच आहे. भाजपांतर्गत उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठीच ही जागा शिंदेसेनेला द्यायचा पर्याय पुढे आल्याचे दिसते. तिथे आवाडे विरोधात महाविकास कडून मदन कारंडे अशा लढतीची चिन्हे दिसत आहेत.