रशिया-यूक्रेन युद्धाबाबत मोठी अपडेट! पीएम नरेंद्र मोदी यांचा थेट पुतिन यांना फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन केलाय. नुकत्याच झालेल्या पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर त्यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत महत्त्वाची चर्चा केली आहे. पीएम मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणाची माहिती ट्विट केलीये. पंतप्रधान मोदी यांनी लिहिले की, आज मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा केली. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सात विशेष आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा केली. रशिया-युक्रेन संघर्ष आणि युक्रेनच्या नुकत्याच भेटीतून मिळालेल्या दृष्टीकोनांवर विचार विनिमय केला.

पीएम मोदींनी लिहिले की त्यांनी संघर्षावर लवकरच चिरस्थायी आणि शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियासोबत शांतता चर्चेसाठी भारताने पुढे यावे असे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी रशिया दौऱ्यावर गेले होते. तेथून आल्यानंतर मोदींनी युक्रेन आणि पोलंडचा दौरा केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ ऑगस्ट रोजी मायदेशी परतले आहेत.

युक्रेन भेटीबाबत पीएम मोदी म्हणाले होते की, माझा युक्रेन दौरा ऐतिहासिक होता. भारत-युक्रेन मैत्री अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने मी या महान देशात आलो आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संभाषण फलदायी ठरले. शांतता कायम राहिली पाहिजे यावर भारताचा ठाम विश्वास आहे. ते म्हणाले होते की, मी युक्रेन सरकार आणि लोकांचे आदरातिथ्य केल्याबद्दल आभारी आहे.