नवेखेड- वाळवा रस्त्यावर पूल उभारण्यासाठी खोदलेल्या खड्डयात अपघाताची मालिका सुरूच आहे. खड्डयात तीन फूट पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. जीव मुठीत घेऊन प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. पुसेसावळी चांदोली महामार्ग क्रमांक १५८ या महामार्गाचे काम दोन वर्षांपासून चालू आहे. हे काम नवेखेड वाळवा ओढ्यावरील पुलापर्यंत येऊन ठप्प झाले आहे. याच पुलाच्या बाजूस ठेकेदाराने सीडी वर्कसाठी जमिनीपासून ५ फूट खोल २० फूट रुंद खड्डा काढला आहे. यामुळे या खड्डयात तीन फूट पाणी साठून हा रस्ता वाहतुकीस बंद आहे.
या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांची गेली दोन वर्षे सदर रस्त्याचे काम संथ गतीने चालू आहे. त्यात अनावश्यक खड्डे काढून वाहतुकीसाठी अडथळा व जीवघेण्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत. वारंवार ठेकेदार व संबंधित अधिकारी यांना याबाबतचे गांभीर्य निदर्शनास आणले तरी यावर कार्यवाही होत नाही. चार दिवसांत रस्ता व्यवस्थित न झाल्यास शेतकरी संघटना आंदोलन छेडणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारास कल्पना देऊनही दुर्लक्ष होत आहे. खड्डा बुजवला नाही तर आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.