इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून शिवसेनेची उमेदवारी….

भारतीय जनता पार्टी इचलकरंजी मतदार संघात गेल्या निवडणुकीत पराभूत झाली. आमदार प्रकाश आवाडे यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. पण, ते या पक्षात सामील झाले नाहीत किंवा त्यांना सामील करून घेतले गेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या उमेदवारीसाठी निमंत्रण दिले होते, अशी चर्चा होती.युवा नेते डॉ. राहूल आवाडे यांची उमेदवारी आम. प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षातून जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाकडून डॉ. राहूल आवाडे यांनी निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा होती. तशा दृष्टीकोनातून दोन बैठका झाल्या होत्या, असे लोक म्हणतात.

पण, भाजपाने सांगितल्याशिवाय आम्ही तुमच्याकडे येणार नाही, असा कदाचित आवाडे यांचा आग्रह असावा.दरम्यान, मुंबईतील हालचाली गतिमान झाल्या. अखेर मंगळवारी रविंद्र माने यांनी निवडणूक लढवावी, असा कदाचित संदेश आला असावा. शिवाय पक्षाने येथे समन्वयक नेमून मंगळवारपासून थेट बैठकाही लावल्या आहेत. इचलकरंजी शहर आणि ग्रामीण भागातीलपक्ष संघटन मजबूत करणे, लाडकी बहिण योजनेचा प्रभाव तपासणे, मराठायोध्दा मराठा हृदयसम्राट मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव लक्षात घेणे, यासाठीचीही काही पथके मंगळवारी दुपारनंतर कार्यान्वित झाली, असे स्पष्टपणे दिसून आले.

रविंद्र माने यांना इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून शिवसेनेची उमेदवारी नक्की झाली आहे, असे मंगळवारी कळाले. तशा दृष्टीकोनातून शहरातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. पक्षाने समन्वयक नेमण्याबरोबरच सोशल मिडिया व निवडणुकीचे काम करणारे तीन पथक येथे पाठवले आहेत.

दरम्यान, एका पथकाच्या प्रमुखाने सांगितले. रविंद्र माने हे आमचे उमेदवार असणार आहेत, तशा दृष्टीकोनातून आमच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, शिवाय पक्ष संघटनही आपल्याला करायचे आहे. दरम्यान, रविंद्र माने यांच्याशी संवाद साधला असता मला निवडणूक लढविण्याच्या दृष्टीकोनातून पक्षाचे बळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.