इचलकरंजी, शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध चौक तसेच विविध भागांमध्ये पुन्हा अतिक्रमणाने डोके वर काढले आहे. रस्त्यावर जागा मिळेल त्या ठिकाणी व्यवसाय थाटल्याचे चित्र दिसत आहे. महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून अतिक्रमण विरोधात कारवाई केली जाते. मात्र, पुन्हा येरे माझ्या मागल्या याप्रमाणे स्थिती होते. याबाबत महानगरपालिका प्रशासन व शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने अतिक्रमणावर कायमचा तोडगा काढण्यासाठी ठोस कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
इचलकरंजीतील अतिक्रमणाचा प्रश्न कायमचाच भिजत पडलेला दिसून येतो. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने काही वेळेस अतिक्रमणाविरोधात मोहीम उघडली जाते. या मोहिमेअंतर्गत हातगाड्या, स्टॅन्ड व इतर साहित्य जप्त केले जाते. मात्र काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा अतिक्रमण करून व्यवसाय थाटल्याचे दिसून येते. गेल्या महिन्यांमध्ये अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली होती. सदरची कारवाई काही दिवस सुरू झाल्यानंतर पुन्हा थंडावली. अतिक्रमण विभागाने दुर्लक्ष केल्याने छोटे मोठे विक्रेते पुन्हा रस्त्यावर आपला व्यवसाय करताना दिसून येत आहेत. तसेच अनेकजण वाहतुकीला अडथळा होईल असे हातगाडे, स्टॅण्ड व इतर साहित्य ठेवल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होऊन अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
फेरीवाला धोरण कागदावरच
शहरातील अंतर्गत वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुकीला अडथळा होणार नाही. अशा ठिकाणी विक्रे त्यांना व्यवसाय करण्यासाठी झोन करणे आवश्यक आहे. मात्र फेरीवाला धोरण राबविले नसल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे अतिक्र मणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग शहरातील मुख्य रस्त्यासह अनेक लहान मोठ्या रस्त्यावर मिळेल त्या जागेवर आपले वाहन पार्किंग करताना दिसून येते. या प्रकारामुळे वाहनांची कोंडी सातत्याने होत असल्याचे दिसून येते. तेव्हा अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करणे गरजेचे आहे. रस्त्यावरच बांधकामचे साहित्य शहरातील लहान मोठ्या गल्ल्यांसह मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून बांधकामाचे वाळू, वीट, सळी आदी साहित्य रस्त्यावरच टाकण्याचे प्रकार वाढत चालले आहे. या प्रकारामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत चालले असून अपघाताला आमंत्रण देत आहेत. रस्त्यावर साहित्य टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.