गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. खरे तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप जोराचा पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचे प्रमाण फारच अधिक होते. मात्र नंतर पावसाचा जोर कमी झाला.
जवळपास सात ते आठ दिवस पावसाने उघडीप दिली. यानंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अन विदर्भमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला.
पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची तीव्रता फारच कमी झाली आहे.दरम्यान, आता भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याची माहिती दिली असून या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आजपासून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आय एम डी ने आजपासून एक सप्टेंबर पर्यंत राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढणार असे म्हटले आहे.IMD ने मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. एक सप्टेंबर पर्यंत यासंबंधीत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.