वाळव्याची ग्रामसभा वादग्रस्त विषयांमुळे वादळी

वाळवा येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा अत्यंत वादळी झाली. त्यानंतर ग्रामस्थांच्या सोयीचा कोणताही निर्णय न घेता सभा घाई गडबडीत उरकण्यात आल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, तर 40 हजार लोकवस्तीच्या गावातील केवळ 180 लोक ग्रामसभेत उपस्थित असल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

ग्रामविस्तार अधिकारी यांनी विषयवाचन केले. बरेच विषय वादग्रस्त होते. हुतात्मा कारखान्याच्या करवसुलीबाबत हुतात्मा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सरपंच संदेश कांबळे हे हुतात्मा गटाचे, तर उपसरपंच हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आहेत. हुतात्माकडून 1 कोटी 48 लाख रुपये येणे बाकी असल्याचे सांगितले जाते, तर कारखान्याने या बाकीपेक्षा अधिक रकमेची कामे केली असून, ग्रामपंचायत आमचेच देणे लागते, असे कारखान्याचे म्हणणे आहे. त्यामुळे कारखान्याच्या येणे बाकीचा विषय निघताच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

बाराबिघा वसाहतीमधील महिलाही मुमताज उलडे यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक झाल्या होत्या; पण काहीही निर्णय घेतला गेला नाही. संजय माने, धनाजी शिंदे, संतोष शिंदे, सचिन थोरात, नेताजी पाटील, मुमताज उलडे यांनी अनेक प्रश्न विचारले. सरपंच कांबळे, उपसरपंच पाटील, संभाजी थोरात, छनुसिंग पाटील, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.