द्राक्षाची खरड छाटणी अंतिम टप्प्यात…..

पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि फाद्यांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी द्राक्षाची खरड छाटणी केली जाते. खरड छाटणीसाठी परराज्यातून सुमारे २० हजार मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत.यंदा द्राक्षाची खरड छाटणी मार्चपासून सुरू झाली आहे. आतापर्यंत ९० टक्के खरड छाटणी उरकली असून उर्वरित छाटणी लवकरच पूर्ण होईल. परंतु पाण्याचे संकट असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

यंदा द्राक्ष खरड छाटणीसाठी स्थानिक मजुरांसह नाशिक, बिहार, उत्तर प्रदेश या ठिकाणाहून मजूर आले आहेत. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून खरड छाटणी सुरू झाली आहे. त्यामुळे यंदा खरड छाटणीसाठी परज्यातून फेब्रुवारीमध्ये मजूर दाखल झाले. मात्र, गतवर्षी खरड छाटणी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाली होती. त्यानंतर पावसाचा खंड पडला. त्यामुळे फळ छाटणीचे नियोजन विस्कळित झाले.

अनेक ठिकाणी एकाचवेळी फळ छाटणी झाल्याने एकाच वेळी द्राक्ष काढणीला सुरुवात झाली.जिल्ह्यातील जत तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागात तीन ते चार टक्के द्राक्षाची काढणी शिल्लक आहे. तर तासगाव, पलूस, मिरज, वाळवा, खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी या तालुक्यातील द्राक्षाची खरड छाटणी पूर्ण झाली आहे. यंदाच्या खरड छाटणीसाठी नव्या जोमाने पुढे आला असून पुन्हा नव्या उमेदीने पुढील वर्षाच्या द्राक्ष हंगामासाठी सज्ज झाला आहे.