वाळवा तालुक्यातील “त्या” वैद्यकीय अधिकाऱ्यासंदर्भात विरोधी व समर्थनार्थ दावे

वाळवा तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. वरिष्ट अधिकारी असून सेवानिवृत्तीच्या अधिकाऱ्यांच्याबाबत आलेल्या उंबरठ्यावर आहेत. त्यांच्याकडून कनिष्ट वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. याशिवाय लैंगिक छळ करण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोपही आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केला आहे. तेथील चार डॉक्टर आणि चार आरोग्यसेविकांनी याबाबत तालुका आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. याबाबतची गंभीर दखल घेवून त्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी दिले आहेत. 

या घटनेनंतर तालुका वैद्यकीय अधिकारी प्रविण पाटील यांनी आरोग्य केंद्रात जाऊन चौकशी केली आहे. आरोग्य केंद्रातील तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची प्राथमिक चौकशी केली आहे. मात्र शुक्रवारी आरोग्य केंद्रातील चार कर्मचाऱ्यांनी ते वैद्यकीय अधिकारी चांगले असून त्यांच्याविरोधात जाणीवपूर्वक तक्रार करण्यात आली असल्याचे लेखी पत्र जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे दिले आहे. एकाच आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत उलट- सलट तक्रारी असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाघ यांनी दिले आहेत.