खानापूर नगरपंचायत हद्दीत असलेल्या अंगणवाडी व बालवाडीमध्ये मूलभूत सोयीसुविधा नसल्याने लहान मुलांची गैरसोय होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे खानापूर नगरपंचायतीने लक्ष देऊन उपाययोजना न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा किसान सभेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अरुण माने यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
खानापूर नगरपंचायत हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी लहान मुलांसाठी अंगणवाडी व बालवाडीची सोय केली आहे. या अंगणवाडी व बालवाड्यांच्या इमारती अतिशय धोकादायक स्थितीमध्ये आहेत. अंगणवाडीच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या ज्या ठिकाणी या अंगणवाडी व बालवाडी भरवण्यात येते तेथे स्वच्छतागृहाची सोय नसल्याने मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या बाबीकडे खानापूर नगरपंचायतीने तातडीने लक्ष देऊन मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी माने यांनी केली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून साथींच्या रोगांनी थैमान घातले आहे. तर दुसरीकडे अस्वच्छतेमुळे रोगराईस निमंत्रण मिळत आहे. या प्रश्नावर उपाययोजना न केल्यास खानापूर ग्रामस्थांच्यावतीने एक सप्टेंबरला खानापूर नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलन व जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येईल, असा इशाराही माने यांनी दिला आहे…