महाविकास आघाडीत पुन्हा काँग्रेसच ठरणार…..

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कोल्हापूर जिल्ह्यात चुरस निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील दहा पैकी किती मतदारसंघ आपल्या वाट्याला येतील?याचा अंदाज लावत वरिष्ठ नेत्यांनी अधिकच्या जागांवर दावा ठोकला आहे. केवळ दोन ते तीन मतदारसंघातील थेट लढतीच्या जागा सोडल्यास इतर मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटात चुरस निर्माण झाली आहे. केवळ कोल्हापूर दक्षिण, कागल आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील बऱ्यापैकी जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. शिवाय संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. मात्र सात मतदारसंघात या तिन्ही पक्षांचा दावा असल्याने तिढा कायम आहे.

मात्र महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचा विचार केल्यास काँग्रेसला सर्वाधिक जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांना फिफ्टी-फिफ्टी जागा मिळण्याची शक्यता आहे.कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे (Congress) सहा आमदार आहेत. त्यातील चार आमदार विधानसभेचे तर दोन आमदार विधान परिषदेचे आहेत. महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या फॉर्मुल्यानुसार विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्या पक्षाला तो मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर आणि हातकणंगले मतदारसंघात विद्यमान आमदार काँग्रेसचे आहेत. त्यामुळे जागा वाटपाच्या फॉर्मुल्यानुसार या चार जागा काँग्रेसकडे राहण्याची शक्यता आहे.

मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या तडजोडीनंतर कोल्हापूर उत्तरवर आपला दावा कायम केला आहे. शिवाय शिवसेना ठाकरे गटाने देखील या मतदारसंघावर आपला दावा केला आहे.शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) जिल्ह्यातील दहापैकी पाच मतदारसंघावर दावा केला असून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी घेतलेल्या मेळाव्यात कोल्हापूर उत्तर, राधानगरी, शिरोळ, शाहूवाडी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. मात्र वास्तविक पाहता कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे हे चेहरे ठाकरे आहेत.

शिरोळ मधून माजी आमदार उल्हास पाटील (Ulhas Patil), हातकणंगले मधून माजी आमदार सुजित मिनचेकर, शाहूवाडीतून माजी आमदार सत्यजित पाटील हे चेहरे ठाकरे गटाकडे आहेत. मात्र राधानगरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडे चेहरा नाही. मात्र महायुतीतून महाविकास आघाडीकडे वळत असलेले माजी आमदार के पी पाटील, ए वाय पाटील आणि राहुल देसाई या तिघांचा पर्याय ठाकरे गटाकडे आहे. तर राजकीय घडामोडी पाहता शाहुवाडी, शिरोळ आणि राधानगरी हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे.