गणेश मंडळांना अधिकृत वीज कनेक्शन घेण्याचे आवाहन….

गणेशोत्सव काळात सर्व ठिकाणी आनंदोत्सव पाहायला मिळतो. गणेशोत्सवाला अगदी काहीच दिवस शिल्लक राहिल्याने सर्वांचीच घाई गडबड सुरू झालेली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांकडून अंतिम टप्प्यात तयारी आली आहे. गणेश मंडळांना उत्सवात कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने महावितरणने तत्काळ वीज कनेक्शन याशिवाय घरगुती दराने वीजपुरवठा करण्याची योजना सुरू केली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी महावितरणकडून केवळ पोलीस ठाणे, नगरपरिषद परवाना, मंडळाच्या अध्यक्षाचे बँक पासबुक व आधार कार्डची झेरॉक्स आणि मंडळ नोंदणीकृत असेल, तर त्याचे पत्र या कागदपत्रांसह नाममात्र अनामत रकमेवर तत्काळ वीज कनेक्शन देण्याचे काम सुरू केले आहे.

याकरिता घरगुती वीज दर आकारण्यात येणार आहे.बहुतांशी गणेश मंडळे अधिकृत वीज जोडणी न करता असुरक्षितपणे वीज जोडणी करतात. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. बऱ्याचवेळा अनधिकृत कनेक्शन घेणाऱ्यांवर महावितरण कारवाई करते. त्यामुळे मंडळांनी रितसर अर्ज करून वीज कनेक्शन घ्यावे असे आवाहन महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी केले आहे.