इचलकरंजी, महानगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पातील भ्रष्टाचारासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी महाविकास आघाडीतर्फे आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे करण्यात आली. त्याचप्रमाणे शहराचा पाणी प्रश्न आणि गुंठेवारी नियमितीकरणाचा प्रलंबित प्रश्नही मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील भ्रष्टाचार आणि घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे कचरा गोळा करण्याच्या कामात होत असलेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महाविकास आघाडीने केली होती. त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल वस्तु:स्थितीशी विसंगत असल्यामुळे या चौकशी समितीचा अहवाल म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचाच प्रकार असल्याचा आरोप करत समितीच्या अहवालाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी शुक्रवारी आयुक्त पाटील यांची भेट घेतली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील भ्रष्टाचारास जबाबदार धरून आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शशांक बावचकर यांनी केली. त्यावर आयुक्तांनी चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे जेसीबी, पोकलँडची अतिरीक्त बिले वसुल करावीत आणि १४ बंद घंटागाड्या तसेच वजन काटा बंद असूनही बिले आदा करण्यात आली. त्यावरही कारवाईची मागणी केली. सागरचाळके यांनी, शहराच्या विस्कळीत पाणी पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांनी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे महावितरण आणि पाणी पुरवठा विभागाने समन्वय साधण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली. त्यावर लवकरच बैठक घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. प्रकाश मोरबाळे यांनी गुंठेवारी नियमितीकरणाची २६० प्रकरणे प्रलंबित असून ती मार्गी लावण्याची मागणी केली. त्यावर आयुक्तांनी ३० सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकरणे निर्गमित करण्याचे दिले. शिष्टमंडळात सुनिल बारवाडे, सुशांत कोटगी, संतोष पाटील, सचिन अतिग्रे, संभाजी सुर्यवंशी, विल्सन वास्कर यांचा समावेश होता.
