सद्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू झालेली आहे. अशातच सांगोला विधानसभा मतदारसंघात तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या तरी महायुतीत व महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
महाविकास आघाडीकडून हा मतदार संघ शेकापला सोडण्यात आला असून या ठिकाणहून डॉ. बाबासाहेब देशमुख किंवा डॉ. अनिकेत देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून खात्रीशीर सांगण्यात येत आहे.
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी गतवेळी आमदार शहाजीबापूंना पाठिंबा दिल्याने त्यांचा काठावर विजय झाला होता. मात्र यंदा तशी परिस्थिती राहिलेली दिसत नाही. माजी आमदार दिपकआबा यांनी जर स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली तर मात्र विद्यमान आम. शहाजीबापू पाटील यांना ही निवडणूक तारेवरची कसरत राहणार आहे.
माजी आमदार दिपकबाआ साळुंखे पाटील यांनी विधानसभा लढवण्याच्या दृष्टिकोनातून गावभेट दौऱ्याचा झंजावात सुरू केला असून त्यांचा दौऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आमदारकी लढवण्यासाठी लोकआग्रह वाढताना दिसत आहेत. त्यात आमदार शहाजीबापू पाटील यांनी देखील मी मैदान सोडलेले नाही आणि सोडणार नाही असा इशारा दिला आहे.
त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. शेकापला डॉ. देशमुख बंधुतील वाद नडू शकतो. तर महायुतीला स्वकीयांचा फटका बसू शकतो अशीच काहीशी परिस्थिती सध्या तरी दिसत आहे.