लोकसभा निकालात महाराष्ट्राने भाजपच्या मनसुब्यावर मोठे पाणी फेरले. यामध्ये मराठा फॅक्टर अनेक मतदारसंघात प्रभावी दिसला. भाजपच्या काही दिग्गजांना मराठा फॅक्टराचा थेट परिणाम दिसला. अनेक मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे दुखावलेल्या समाजाने मतपत्रिकेतून नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. आता लोकसभा निकालानंतर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
त्यांनी मराठा फॅक्टरची अप्रत्यक्ष आठवण करुन देत असा इशारा दिला.मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षीच्या मध्यात मोठी घाडमोड घडली. मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागे महाराष्ट्रातील मराठा समाज उभा राहिला. जालना जिल्हा राज्याच्या केंद्रस्थानी आला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्य सरकारच्या भूमिकेविषयी जरांगे पाटील यांनी कायम साशंकता व्यक्त केली.
त्याचा फटका राज्यात अनेक लोकसभा मतदारसंघात दिसून आला. मराठवाड्यात पण या फॅक्टरच्या माध्यमातून मराठा समाजाने त्यांची नाराजी दाखवून दिली. देवेंद्र फडणवीस यांनी आता कोणालाही अंगावर घालू नये. लोकसभेला जसा इंगा दाखविला तसा विधानसभेला दाखवेन,असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिला.
आरक्षण दिले नाहीं तर राज्यातील 288 विधानसभा जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव व्हायला नको होता. महापुरुषांचे वंशज निवडणुकीत पडले नाही पाहिजे. पंकजा मुंडे यांनी पराभवाची कारणे शोधली पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले.
