नोव्हेंबरमध्ये आगामी विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत. त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. प्रत्येक गटाची आपापली रणनीती सुरू झालेली आहे. अशातच सभा, मेळावे यांचे आयोजन केले जात आहे. परंतु कोणत्या पक्षाकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याविषयीचे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा एक महत्त्वाचा मतदारसंघ ओळखला जातो. सध्या या मतदारसंघातील राजकीय पक्षातील वातावरण तापत चालले आहे. युवा नेते राहुल आवाडे विरुद्ध शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने अशी लढत होण्याची चित्र जवळपास स्पष्ट होत चाललेले आहे. युवा नेते राहुल आवाडे हे प्रेशर कुकर हे चिन्ह घेऊन ताराराणी पक्षातून लढणार अशी भूमिका समर्थकांनी सुरू ठेवली आहे.
तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीकडून इचलकरंजीची जागा काढून घेण्यात यश आलेले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांना धनुष्यबाण चिन्ह मिळणार अशी चर्चा माने समर्थकांच्यात आहे. त्यामुळे आवडे विरुद्ध माने असा संघर्ष इचलकरंजीत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. मदन कारंडे यांची उमेदवारी झाल्यानंतर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात लढतीचे चित्र कसे असणार हे आगामी काळात दिसेलच.