राज्यातील महायुतीचे सरकार सर्वसामान्य जनतेच्या समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने चालविण्याचा निर्णय राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात उच्चस्तरीय अतितात्काळ बैठकीत घेण्यात आली. तसेच या योजनेच्या वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी सदरची योजना सोलरवर चालविण्याचा निर्णय घेतला असून सदर योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यामुळे सांगोला तालुक्यातील ८१ गावांसह वाड्यावस्त्यावरील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी शासनाने चालविण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील जनतेमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ही योजना सोलर वर चालविण्यातयेणार असल्याने वीज बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
सांगोला तालुक्यातील ८१ गावासह वाड्यावस्त्यांवरील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव, जलजीवन मिशनचे मिशन संचालक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.