इचलकरंजीत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! रात्री उशिरापर्यंत मंडळांची मिरवणूक

काल सर्वत्र उत्सवाचे आणि चैतन्याचे वातावरण होते. कारण सर्वांच्याच घरी गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे. अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये अनेक मंडळांनी आपापल्या मंडपात गणेशाची प्रतिष्ठापना केलेली आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात तसेच अनेक पारंपारिक वाद्य, डॉल्बी, झांज पथक, फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत इचलकरंजी शहरामध्ये मोठ्या उत्साहाने गणपतीचे आगमन करण्यात आले.

अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच घरोघरी भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शहरातील कॉ. के. एल. मलाबादे चौक ते गांधी पुतळा या मुख्य मार्गावरील बाजारपेठ गर्दीने ओसंडून वाहत होती. हार तुरे, फुले यासह सजावटीच्या साहित्यामध्ये दरवाढ होऊनही या वस्तूंना बाजारातून चांगला प्रतिसाद मिळत होता.

शहरांमध्ये सार्वजनिक मंडळांनी आपली श्रीमूर्ती महात्मा गांधी पुतळा परिसरात आणून ठेवलेली होती आणि काल दुपारनंतर वाद्यांच्या गजरात आणि जल्लोषात या श्रीमूर्ती भागाभगात रवाना होत होत्या.