तारदाळमध्ये चार लाखांची घरफोडी; लाखाच्‍या रोकडसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश

कोल्हापूर जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरु आहे त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले जात आहे. दिवसाढवळ्या चोरी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. असाच एक चोरीचा प्रकार तारदाळ येथे उघडकीस आला आहे. तारदाळ येथे उरुसासाठी परराज्यात गेलेल्या कुटुंबाच्या घरात घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली. मुख्य दरवाज्याचा कडीकोयंडा उचकटून तिजोरीतील सुमारे पावणेआठ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, तसेच रोकड एक लाख रुपये असा एकूण चार लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. याबाबतची फिर्याद यास्मिन रमजान पठाण यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यास्मिन पठाण यांचे कुटुंबीय मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सदलगा येथे उरूसासाठी गेले होते. ही संधी साधून चोरट्याने रात्रीच्या सुमारास दाराला असलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये ठेवलेल्या एका लोखंडी तिजोरीचे लॉक तोडले.

तिजोरीतील अडीच तोळे वजनाची सोन्याची मोहनमाळ, अर्धा तोळ्याची बोरमाळ, दीड तोळ्याचे नेकलेस, अर्ध्या तोळ्याचे कानातील टॉप्स, सव्वा तोळ्याचे गंठण, दीड ग्रॅमची बुगडी, अडीच ग्रॅमच्या रिंगा, तसेच पाच भाराचे चांदीचे वळे, तोडे, पैंजण, करदुरा यासह रोख एक लाख रुपयांवर चोरट्याने डल्ला मारला. मंगळवारी सकाळी घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप नसल्याचे निदर्शनास आले.

याबाबतची माहिती शहापूर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, निरीक्षक सचिन सूर्यवंशी आदींनी भेट दिली. ठसेतज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. घराच्या बाजूला काही पावलांवरच श्वान पथक घुटमळले.