9 ते 12 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसणार !

गेल्या काही दिवसांपासून रजेवर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. पण सप्टेंबर महिन्याची सुरुवात जोरदार पावसाने झाली.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. प्रामुख्याने मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्यातील परभणी, छत्रपती संभाजीनगरसह इतर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झाला.

पण, तदनंतर तीन-चार दिवस पावसाने विश्रांती घेतली.पण आता गत दोन दिवसांपासून म्हणजेच गणेश चतुर्थी पासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या 30 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

यातील कोकणातील रायगड, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर, विदर्भ विभागातील अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या 15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे.