यावेळी ज्येष्ठा गौरी आवाहन म्हणजेच महालक्ष्मी मंगळवार, १० सप्टेंबर रोजी पडत आहे. पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी ९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी सुरू होत असून, १० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी समाप्त होत आहे.उदया तिथीनुसार १० सप्टेंबर मंगळवार रोजी ज्येष्ठा गौराईच आगमन होणार आहे.
गौरी आवाहनच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते आणि तीसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते. अनुक्रमे ११ सप्टेंबरला गौरी पूजन केले जाईल तर १२ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन केले जाईल. गौरी पूजनाच्या दिवशी सगेसोयरीक जेवणाला सांगितले जातात. गौरी पूजन आणि आरती करतात तसेच जेवायला पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो.
नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी करतात.तीसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात.
गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते. कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.