इस्लामपुरात रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, काडतूससह 1 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

इस्लामपूर येथील दत्त टेकडी परिसरात इस्लामपूर पोलिसांनी दोघांकडून रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, जिवंत काडतूस, तलवार, दुचाकी असा 1 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री ही कारवाई केली.

याप्रकरणी रोहन राजन शिंदे (वय 22, रा. अभियंतानगर, इस्लामपूर), सुशांत सुभाष कुडाळकर (वय 37, रा. दत्त टेकडी, इस्लामपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. शनिवारी रात्री पोलिस निरीक्षक संजय हारुगडे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे, पोलिस हवलदार संदीप गुरव, सतीश खोत, अमोल सावंत, दीपक घस्ते, विशाल पांगे, तोसिफ मुल्ला यांचे पथक इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीमध्ये गस्त घालत होते.

रोहन शिंदे हा दत्त टेकडी परिसरात दुचाकीवरून फिरत असून त्याच्याकडे शस्त्र असण्याची शक्यता असल्याची माहिती पथकाला मिळाली. रोहन हा दुचाकी (एम.एच. 12 एजे 0020) घेऊन थांबला होता. पोलिसांना पाहताच त्याने दुचाकीवरून धूम ठोकली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता एक रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतूस मिळाले.

दुचाकीच्या सीटजवळ तलवार सापडली. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता 3 महिन्यांपूर्वी सुशांत कुडाळकर याच्याकडून पिस्तूल घेतले होते, त्याला मी परत केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कामेरी रस्ता परिसरात छापा टाकून सुशांत कुडाळकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्तूल सापडले.