खासदार विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या कठीण परीक्षेत ‘काय बोलायचे, यापेक्षा काय बोलायचे नाही हे ठरवले होते.त्यांचा प्रचंड संयम, या निवडणुकीत कौतुकाचा विषय ठरला. आता मात्र त्यांचा संयम सुटू लागल्याची चर्चा होते आहे.
खानापुरात शिवसेना शिंदे गटाच्या सुहास बाबर यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली, मात्र तो वाद मिटण्याआधी तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही असे विधान त्यांनी केले आहे. मला असे म्हणायचे नव्हते असेही ते पुन्हा सांगत आहेत.
विशाल यांचे खानापूर-आटपाडीतील १७ हजारांचे मताधिक्य हे काही कोडे नाही. काँग्रेसची अवस्था बिकट असताना बाबर गट पाठीशी उभा राहिला. सुहास बाबरांशी पैरा झाला. तो आता फेडावा लागेल. त्याची जाहीर व्यासपीठावर वाच्यता केल्याने विशाल यांची अडचण झाली.
सुहास यांना एक लाख मताधिक्य मिळायला हवे, मी सोबत आहे अशी घोषणा त्यांनी केली. मात्र प्रकरण अंगाशी आल्यानंतर मी त्यांना महाविकास आघाडीत घेऊन मताधिक्य देणार आहे असा युक्तिवाद त्यांना करावा लागला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जखम ताजी आहे, त्यावर विशाल यांनी मीठ चोळल्याची त्यांची भावना झाली.
विश्वजित, विशाल यांनी दिल्लीत ठाकरेंची भेट घेऊन आठवडा उलटण्याच्या आधी विशाल यांच्या वक्तव्याने वादाची ‘मशाल’ पेटली. लोकसभेला विशाल यांच्यासाठी अजितराव घोरपडे यांचे बंड महत्त्वाचे ठरले. राष्ट्रवादीच्या आबा गटाने पूर्ण ताकद दिल्याने संजयकाकांच्या घरच्या मैदानात विशाल यांना आघाडी मिळाली. आता घोरपडे गटालाही विधानसभा लढवायची असेल तर दोघांपैकी विशाल यांनी कोणाला मदत करायची, ही कोंडी साहजिक आहे.
