गणेश आगमन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! ५१ मंडळांवर कारवाई

राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत ५१ मंडळांनी आवाजाचा दणदणाट करून ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केले. सर्वाधिक १२० डेसिबल आवाजाची नोंद करून मंडळांनी नकोसा विक्रम नोंद केला.संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह ध्वनी यंत्रणा मालकांवरही पोलिसांकडून न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार गणेश आगमन मिरवणुकीत मंडळांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले होते. मात्र, राजारामपुरी येथील आगमन मिरवणुकीत सहभागी झालेल्या ५४ पैकी ५१ मंडळांनी आवाज मर्यादेचे उल्लंघन केले.

रहिवासी क्षेत्रात ५५, तर व्यावसायिक क्षेत्रात ६५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज वाढवू नये, असे कायदा सांगतो. मात्र, मंडळांनी नियमांकडे दुर्लक्ष करीत प्रत्यक्षात १२० डेसिबलपर्यंत आवाजाचा दणदणाट केला. पोलिसांच्या तीन पथकांनी शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत मिरवणुकीतील मंडळांच्या ध्वनियंत्रणांची तपासणी केली.