इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सज्ज! 71 कुंडांची उभारणी

सगळीकडे गणेशोत्सवाचे वातावरण आहे. सर्वत्र अगदी गोड नैवेद्यापासून घरोघरी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पा घरी आले की सगळीकडे चैतन्यपूर्ण वातावरण पाहायला मिळते. बाजारपेठा देखील सजलेल्या पाहायला मिळत आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये गणेशोत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो. तसेच गणेशोत्सव फेस्टिवलचे देखील आयोजन दरवर्षी करण्यात येते.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना देखील करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील शहापूर खन तसेच शहरातील विविध 71 ठिकाणी कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे इचलकरंजी शहरातील सर्वच गणेश भक्तांनी आपल्या श्री गणेश मूर्तीचे विसर्जन आपल्या घराजवळच्या कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन कुंडात अथवा शहापूर खण येथे करावे आणि पर्यावरणपूरक तसेच आनंदी वातावरणात गणेशोत्सव साजरा करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.