वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विशेष मोहिमे अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या १०५ चालकांवर त्याचबरोबर विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७५९४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
तीन महिन्यात केलेल्या या कारवाईत एकूण ७६९९ जणांकडून ६५ लाख ५३ हजार १०० रुपये इतका दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि राजीव पाटील यांनी दिली. ते म्हणाले, शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष मोहिम राबविण्यात आली.
त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालविणे (१०५), ट्रिपल सीट ( ५९०), लायसन जवळ नसणे (१६०४), वन वे मध्ये प्रवेश (४८२), वाहन चालविताना मोबाईलचा वापर (८४९), विना नंबरप्लेट व फॅन्सी नंबरप्लेट (३८५), अवैध प्रवासी वाहतूक (३९), बुलेट मॉडीफाय सायलेन्सर ( ३९ ), बेशिस्त वाहन पार्किंग (१७९९), अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे (१५), लयमशक्य वाहन चालविणे (२३), लायसन निलंबित (४४), बी.पी. अॅक्ट १२४ नुसार (३), नाकाबंदी ॲप अलर्टद्वारे वाहन ताब्यात (१०) व डुप्लिकेट नंबरप्लेट (१) अशा ७६९९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
सर्वांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ हजारपासून १० हजारापर्यंत दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ही मोहिम यापुढेही सुरुच राहणार
आहे. ज्यांच्यावर दंड प्रलंबित आहे त्यांनी दंड शहर वाहतूक शाखा इचलकरंजी येथे भरावा. अन्यथा संबंधित वाहनचालकांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात येतील. बुलेट वाहनाला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवल्याचे आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ शहर वाहतूक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.
