घरमालकाच्या तिजोरीवर भाडेकरूचा डल्ला! रोख रकमेसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास

 अलीकडच्या काळात चोरीच्या प्रकरणात वाढ झाल्याचे चित्र सर्वांच्याच नजरेस आहे. दिवसाढवळ्या बंद घरे फोडली जात आहेत. लाखोंचा ऐवज हातोहात लंपास केला जात आहे. घरमालक बाहेर गेल्याची संधी साधत भाडेकरूने १ लाखाच्या रोकडसह पावणे दोन लाखाचे दागिने असा २ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी भाडेकरू रमेश राजगुरु याच्यावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ. माधुरी शितल पाटील (वय ३२ रा. आयोध्यानगर ठाकरे चौक खोतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.  याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, खोतवाडीतील आयोध्यानगर परिसरात सौ. शितल पाटील या राहण्यास आहेत.

त्यांच्याकडे रमेश राजगुरु हा भाड्याच्या खोलीत राहण्यास आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास शितल पाटील या भाजीपाला विक्रीसाठी गेल्या होत्या. त्याचवेळी घरी कोणी नसल्याची संधी साधत राजगुरु याने पाटील यांनी तिजोरीत ठेवलेले १ लाख रुपये तसेच सव्वा लाखाचे सोन्याचे अडीच तोळ्याचे गंठण, ५० हजाराची एक तोळ्याची सोन्याची अंगठी १० हजाराचे सोन्योच्या दोन ग्रॅमच्या साखळ्या असे १ लाख ८५ हजाराचे सोन्याचे दागिने असे मिळून २ लाख ८५ हजाराचा ऐवज चोरला. या प्रकरणी सौ. पाटील यांच्या फिर्यादीवरुन रमेश राजगुरु याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.