अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात खूपच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तसेच सांगली जिल्ह्यात देखील चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. हातकणंगले तालुक्यातील नेज येथे विधानसभा निवडणुकीच्या सर्वेच्या नावाखाली गावात सर्वे करत असताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी चार महिला व दोन पुरुषांना रंगेहात पकडले आहे.
यावेळी त्यांनी आपण निवडणुकीच्या सर्वेसाठी आलो असल्याची माहिती दिली. परंतु सदर महिला या उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश परिसरातील असून त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचे सदर सर्वेचे कागदपत्रे नसल्याने नेज पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांनी तपासून पाहिले व ग्रामस्थांचा रोष पाहता सर्व महिलांना स्वतःच्या चार चाकीतून हातकणंगले पोलीस स्टेशन येथे हजर केले.
यावेळी हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी करून पुढील तपासासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस मुख्यालयात हजर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी नेज ग्रामस्थांनी दाखवलेली एकी व चोरी होऊ नये यासाठी पोलीस पाटील व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न याचे हातकणंगले पोलिसांच्या वतीने कौतुक करण्यात आले.