नागपुरातील या निवडणुकीत काँग्रेस-भाजप युतीच्या पॅनेलचा विजय, राष्ट्रवादीचा पराभव

राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आले आहे. महायुतीत भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. परंतु स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारची युती होत असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात काँग्रेस-भाजप युती झाली. या युतीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलचा पराभव केला.

कट्टर विरोधक एकत्र
राज्यात भाजप आणि काँग्रेस कट्टर विरोधक आहे. परंतु कट्टर विरोधक असलेले हे दोन्ही पक्ष एकत्र आले. भाजप आणि काँग्रेसने नागपूर जिल्ह्यातील मौदा खरेदी विक्री संघाची निवडणूक पॅनल तयार करुन लढवली. मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत (elections)काँग्रेस-भाजप युतीचे पॅनेल निवडून आले. या पॅनलने एकाकी पडलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रसच्या पॅनलचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यानी त्यांचे पॅनेल या निवडणुकीत उतरवले होते. परंतु त्यांच्या सर्व उमदेवारांचा पराभव झाला.

काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि भाजपचे माजी आमदार टेकचंद सावकर यांच्या पॅनेलचे सर्व 13 उमेदवार निवडून आणले आहे. निवडणुकीतील(elections) विजयानंतर काँग्रेसचे खासदार शामकुमार बर्वे, भाजपचे माजी आमदार टेकचंद सावरकर आणि विजयी उमेदवारांचे फोटोसेशन झाले.

बाबा गुजर यांची थेट अजीत पवार यांच्याकडे तक्रार
राष्ट्रवादी दादा गटाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर यांनी यासंदर्भात थेट अजीत पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. ते म्हणाले की, माजी आमदार टेकचंद सावरकर आणि सुनील केदार यांनी भ्रष्ट युती केली. सुरुवातीला राष्ट्रवादीकडून आम्ही टेकचंद सावरकर यांच्याशी बोलणी केली. आमची युती झाली होती. फार्म भरण्यापर्यंत आम्ही एकत्र होतो. पण त्यांनी अचानक आम्हाला धोका दिला. महायुतीमध्ये मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता टेकचंद सावरकर यांच्यावर भारतीय जनता पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी बाबा गुजर यांनी केली. दरम्यान, या प्रकरणात भाजप नेते आता काय भूमिका घेणार, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे.