इस्लामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आतापासूनच निवडणुकीची साखर पेरणी सुरू

सध्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार जयंत पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील व हुतात्मा उद्योग समूहाचे गौरव भाऊ नायकवडी यांची तालुक्या शहरांमधील विविध गणपती मंडळांना भेटी देत त्यांनी आतापासूनच निवडणुकीची पेरणी करण्यास सुरू केले असल्याचे दिसून येत आहे.

महाविकास आघाडीकडून मा. आ.जयंत पाटील हे
उमेदवार म्हणून जाहीर झाले आहेत. महायुतीतून त्यांच्या विरोधात अनेकजण निवडणूक लढवण्यास इच्छुक असून उमेदवार कोण ? हे अजून ठरले नाही तरी देखील भाजपाचे निशिकांत दादा पाटील यांनी व हुतात्मा उद्योग समूहाचे गौरवभाऊ नायकवडी यांनी या मतदारसंघात भेटीगाठीसह विकास कामांच्या शुभारंभासाठी जोर दिला आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये परमनंट आमदार म्हणून जयंत पाटील यांची ओळख आहे त्यांनी या मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत.

त्यांच्या कामाची पद्धत यामुळे तालुक्यात
ते नेहमी उच्चांक मतांनी निवडून येत आहेत. या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना या मतदारसंघात थांबवण्यासाठी विरोधकांनी चक्रव्यूह आखले असून या चक्रव्यूह मध्ये ते अडकतात का हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच वाळवा तालुक्यात विरोधकांच्यामध्ये एकमत नसल्याने येथे जयंत पाटील यांच्या विरोधात निवडणूक कोण लढणार हे अजून ठरले नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

तसेच इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच या मतदारसंघांमध्ये गणपती उत्सवाच्या माध्यमातून गणपती मंडळासह भेटीगाठी घेण्यास सुरुवात देखील केलेली आहे. आष्टा शहरांमध्ये प्रामुख्याने भाजपाने या मतदारसंघांमध्ये संपर्क वाढवला आहे. निशिकांत दादा पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी विविध मंडळांना भेटी देत संपर्क वाढवीत आहेत.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राजारामबापू साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीकदादा पाटील यांनी देखील या शहरांमध्ये विविध गणेश मंडळांना तसेच मळे भागातील गणेश मंडळाना भेटी देत संपर्क सुरू ठेवला आहे. सध्या गणपती उत्सव सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपाकडून राजकीय पेरणी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.