खानापूर मतदारसंघाच्या राजकारणामध्ये…..

खानापूर मतदारसंघाच्या राजकारणामध्ये आता मोठी चुरस निर्माण झालेली असून थांबायचं नाही गड्या आता थांबायचं नाही तर निवडणूक लढवायचीच अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. सुहास भैया बाबर शिवसेना शिंदे गटाकडून निश्चित उमेदवार आहेत. सुहास बाबर यांनी मोठमोठे निधी आणून मतदारसंघात कामांचा धडाका लावला आहे. तसेच जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला असून नुकतेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी विटा येऊन सुहास बाबर यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

दुसरीकडे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील गटाकडून वैभव दादा पाटील यांनी जोरदार तयारी चालवली असून त्यांनीही मतदारसंघ संपर्क वाढवला आहे. वैभव पर्व 2024 दहीहंडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात युवा वर्गाला आकर्षित केले. त्यावेळी वैभव दादा यंदा आमदारच घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. वैभव दादा गटाकडून ही उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरू असून माघार घेण्याची शक्यता तूर्तास तरी दिसत नाही.

आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांनीही शड्डू ठोकला असून खानापूर मतदारसंघात त्यांनी जोरदार यंत्रणा लावलेली आहे. त्यातच माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी मैदानात उतरून उमेदवारी करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत.

नुकतेच राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांनी सुहास बाबर यांची भेट घेऊन राजेंद्रअण्णा यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भात विनंती केली. त्यामुळे मतदारसंघात चौरंगी लढत होणार की काय? अशी शक्यता निर्माण झाली असून आता कोणी थांबायचं? हा नेमका प्रश्न असून आगामी काळात बऱ्याच घडामोडी घडण्याचे दिसत आहे.

हे सर्व घडत असताना वंचित आघाडीकडून संग्राम माने यांनी उमेदवारी संदर्भात चाचणी केली असून वंचित आघाडी काय निर्णय घेणार यावरही बऱ्याच घडामोडी घडणार आहेत.