Sangola Crime : मुलीला पळवून नेण्यास मदत केल्याचा संशय! पत्रकाराला बेदम मारहाण

मुलीला पळवून नेल्याप्रकरणी मदत केल्याचा रोष धरून मुलीच्या वडिलांसह काहीजणांनी पत्रकारास शिवीगाळ व दमदाटी करत काठी व एसटीपी पाइपने जबर मारहाण केल्याची घटना महूद (ता. सांगोला) येथे रविवारी (ता.१५) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहा जणांविरोधात महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी पत्रकार दीपक धोकटे हे रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घरातून अंघोळ करून गावातील महादेव मंदिर येथे नेहमीप्रमाणे दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी घराच्या समोर गावातील बापू येडगे, हरिचंद्र येडगे, प्रकाश कोळेकर यांच्यासह इतर दोघांनी दुचाकीवर येऊन त्यांच्यापैकी बापू येडगे याने, तू पत्रकार आहे म्हणून माझी मुलगी पळवून नेण्यास मदत केली आहे. आता माझी मुलगी कुठे आहे हे तुला माहिती आहे, असे म्हटल्यावर दीपक धोकटे हे, मला तुमच्या मुलीचा पत्ता माहिती नाही, असे समजून सांगत होते. त्यावेळी त्या लोकांनी फिर्यादीला काठीने तसेच एसटीपी पाइपने पाठीवर, डोक्यात, पायावर मारहाण करू लागले. दीपक धोकटे यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांची पत्नी बाहेर आली व थोड्या वेळाने आई- वडिलांनी त्या ठिकाणी येऊन त्यांच्या तावडीतून दीपक यांना सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही धक्काबुक्की केली व त्यांच्याकडील दुचाकी (एमएच ४५- ६३८५) वर बळजबरीने बसवून घेऊन जाऊ लागले.त्यावेळी दीपक धोकटे त्यांना विरोध करीत होते, परंतु त्यांनी हाताने मारहाण करीत महूद येथून गार्डी फाटा, खिलारवाडी फाटावरून पुढे सुपली मार्गे सुपली गावाच्या शिवारात कॅनॉलवर आणून मारहाण केली. त्यानंतर त्यांना कोणाचा तरी फोन आल्यानंतर त्यांनी परत त्यास गावी महूदला आणून सोडले व फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची दीड तोळ्याची रुद्राक्षाची माळ काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले असून, याचा तपास मी स्वतः करणार आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल.